Thursday, April 28, 2011

भाग ५

बऱ्याच दिवसांनी (की वर्षांनी ) इथं लिहीत आहे. ही गोष्ट क्रमशः आहे तेव्हा पहिल्या भागापासून वाचली तर अधिक संगती लागेल.

---------------

मिल्या धापा टाकत टाकत माझ्यापुढे येऊन उभा राहिला. मला कळेना एवढं धावण्यासारखं झालं तरी काय? शेवटचा रिसल्टच्या दिवशी मिल्या धावलेला मला आठवत होता. आणि तो धावत आल्यामुळे काहीतरी गंभीर बाब तो सांगणार हे मला कळलं.

" पांड्या, आयला मज्जाच झाली. "
" मज्जा? कसली मज्जा झाली? "
" अरे काही नाही यार, मी तुला म्हटलं ना मी बाबांच्या ओळखीने डमी आर्टिकल्स टाकणारे म्हणून? "
" हो मग? "
" मग काय मग, आज मी त्या सरांना भेटायला गेलो होतो. "
" मग झालं का काम? "
" काम तर झालंच पण तुला माहितेय का, तिथे रश्मी आणि सीमापण जॉईन होतायत. "
" चले, कसं शक्य आहे? "
" अरे त्या सरांनीच सांगितलं मला. "
" तू बाळांकडे गेला होतास का? "
" नाही रे नातू म्हणून आहेत, ते पांढरे आइसक्रीमचं दुकान आहे ना? अरे दत्ताचं देऊळ आहे ना कोपऱ्यावर तिथे. "
" मिल्या, साल्या, काय सांगतोस. रश्मीच्या ताईची बहीण तिथेच काम करते, अरे आम्ही तिघंही तिथंच आहोत. "
" पांड्या, काय सांगतोस, तो नातू काही म्हणाला नाही. "
" अरे तुरे कसला करतोस, सर आहेत ना तुझे ते? "
" पांड्या, नातवाला अहो जाहो करणं नाही जमायचं मला, काय? "
" नातवाची ही गत तर बाळाची काय होईल? "

मी जोरात ओरडलो तसा मिल्या खी खी खी खी करून हसायला लागला. म्हणजे शेवटी आम्ही चौघेही एकाच फर्ममध्ये लागणार. मिल्या सोबत असल्याने मला चांगलाच धीर येणार होता. मी त्या ऑफिसमध्ये एक गोष्ट पाहिली होती. बाहेरचा चपरासी, नातू आणि बाळ सोडून सगळ्या बायकाच होत्या. त्यात रश्मी आणि सीमाची भर. बरं नातू आणि बाळांच्या किंवा बाहेरच्या चपराश्याच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारणं शक्य नव्हतं. रश्मीच्या खांद्यावर चाललं असतं, पण ते जवळ जवळ अशक्यच होतं. आणि मिल्या असला की मला एकदम माझ्या कंफर्ट झोनमध्ये असल्यासारखं वाटतं. आपल्यापेक्षा ढ, गबाळा कुणीतरी आहे म्हणून थोडा आत्मविश्वास वाढतो. आणि तो माझा मित्र तर आहेच.

" अरे मिल्या पण तू डमी टाकणारेस ना? मग काय उपयोग? " मी शंका काढली.
" पांड्या, नातू आपल्याला आवडला. तो म्हणाला डमी टाकणं चांगलं नाही, तुला हव्या तेवढ्या सुट्ट्या घे, पण अधे मध्ये तरी येत जा. "

मिल्याच्या वडील इनकम टॅक्स डिपार्टमेंटात ऑफिसर आहेत. त्यांच्या अशाच बऱ्याच बऱ्याच ओळखी असतात. ओळखीमुळे त्याची सगळी कामं अशी सोपी होतात. तरी ओळखीमुळे मार्क देत नाहीत हे बरं, नाहीतर माझ्यापेक्षा त्यालाच मार्क जास्त मिळाले असते. ओळखीमुळे त्याला अशी आव जाव घर तुम्हारा आर्टिकलशीप मिळते, ओळखीमुळे दर सुट्टीला मिल्या आणि मंडळी दूरदूर कुठल्या कुठल्या ठिकाणी जातात. आमच्या बाबांच्या ओळखी का नाहीत असा प्रश्न मला नेहमी पडतो. कधी कधी मिल्याचा खूप रागही येतो, जळफळाट होतो. पण कधी कधी काही लोकं मिल्याचे बाबा पैसे खातात असं म्हणतात, तेव्हा आपल्या बाबांच्या ओळखी नाहीत याचं बरंही वाटतं. अर्थात ते पैसे खात असतील असं मला वाटत नाही. खाण्याचं खातं मिल्याकडेच आहे.

जसा आला तसा मिल्या निघून गेला, आईची स्वैपाकघरात काहीतरी धावपळ चाललेली. मग मी एकटाच कॉटवर पडून विचार करीत राहिलो. उद्यापासून कामाला सुरुवात करायची होती. असं सकाळी उठून डबा वगैरे घेऊन कामाला जायचं आणि मस्त संध्याकाळपर्यंत असं रपारप रपारप कामंच करीत राहायचं. जबरदस्त मजा येणार होती. बाळ पगाराचं काही बोलले नव्हते, पण पहिल्या वर्षाला किमान तीनशेवीस रुपये द्यावे लागतात हे माहीत होतं. महिन्याला तीनशेवीस म्हणजे आठवड्याला ऐंशी. दिवसाचे साधारण साडेअकरा रुपये. जवळ जवळ चार वडापाव, किंवा दोन वडापाव आणि दोन ऊसाचे रस. रपारप रपारप काम करून मी दमलो तर फक्त एवढंच?

बराच वेळ विचारांची गाडी रूळ बदलत राहिली. नातू, बाळ, चपराशी, मिल्या, सीमा, रश्मी आणि ऑफिसातल्या उरलेल्या साळकाया म्हाळकाया एकामागोमाग डोळ्यासमोर येत होत्या. चपराशी, नातू आणि बाळ नको तितक्या वेळा आठवत होते. करता करता कधी झोप लागली काही कळलंच नाही.

No comments: