Sunday, June 28, 2009

रिझल्ट

"च्यायला काय उपटत बसलेत इतका वेळ? "

खाऱ्या शेंगदाण्याच्या पंधराव्या पुडीतला शेवटचा दाणा एका जोरकस शिवीसह दाताखाली कुटताना मिल्या म्हणाला. भयंकर टेन्शन आलं की मिल्या शेंगदाणे खातो. आणि तो सतत कुठल्या ना कुठल्या टेन्शनमध्येच असतो. शेंगदाणे खाऊन खाऊन तो स्वतः बटाट्यासारखा झाला आहे. वर तो एवढ्या भरभर शेंगदाणे संपवतो की एक एक रुपया काढून दोन रुपयाचे दाणे घेतले तरी दोन पैशाचेसुद्धा आपल्याला मिळत नाहीत. आणि आज तर त्याला एकदम जोर चढलेला. परीक्षेचा निकाल ह्यापेक्षा अधिक टेन्शन देणारी गोष्ट कोणती असेल?

मिल्याच्या पुड्या संपतायत तर त्याच्या बाजूला सीमा उभी राहून कायतरी पुटपुटतेय. तशी सीमा चांगली आहे. पण एकदम भोळी आहे. दिसायला नाकी डोळी नीटस वगैरे आहेच, पण एकदम बारीकपण आहे. सीमा मिल्याच्या शेजारी उभी राहिली की एकतर दहा नाहीतर एक ह्यापैकी एखादा आकडा आपण बघतोय असं वाटतं. तिचा साधेपणा, उर्फ भोळेपणा उर्फ बावळटपणा सोडला तर ती छानच आहे. आज जरा डोळे दमल्यासारखे वाटतायत. रात्रभर झोपली नसणार. आमची सीमा म्हणजे भक्तिभावाची परिसीमा आहे. रस्त्यात दिसलेल्या प्रत्येक देवळाला हात जोडलेच पाहिजेत असा तिचा नियम आहे. रोज सकाळी आणि झोपायच्या आधी रात्री न चुकता ती देवाला वगैरे नमस्कार करते. झालंच तर ती वार लावून देवळात पण जाते. सोमवारी शंकररावांपासून सुरवार होते ती शनिवारी मारुतरावांपाशी जाऊनच तिचा आठवडा संपतो. रविवारी ती देवदर्शनापासून स्वतःला सुट्टी देते. मी तिची खूप टिंगल करतो, पण ती मला कधीच उलट बोलत नाही. तशी आमची एकदम लहानपणापासूनची मैत्री आहे.

तेवढ्यात मिल्या अजून एक दाण्याची पुडी घेऊन आला.

"अरे काय हे साले काय लावलंय काय? वाजले किती? करतायत काय हे लोक? " आल्या आल्या माझ्यावरच डाफरला.
"लेका, दाणे खाऊन खाऊन पित्त चढलंय तुझं. जरा चिल! "
"चिल म्हणे चिल, पांड्या तुझं ठीके, तू अभ्यास करून बसलायस. आम्ही साले पोरी पाहत राहिलो ना ओ वर्षभर"
"अजून सांगतोय सुधार, दाणे खातानासुद्धा त्या पांढऱ्या पंजाबीवरची नजर हटत नाहीये तुझी"
" पांड्या गप्प. अरे टेन्शन आलं की असंच होतं"

आमचं हे असलं बोलणं सीमाच्या सहनशक्तीपलीकडचं होतं. आता ती कानावर कात ठेवून हिंदी पिक्चरमधल्या नटीसारखी "नही" असं ओरडणार तितक्यात "रश्मी" असं मी बेंबीच्या देठापासून ओरडलो. पोरांच्या घोळक्यातून रश्मी नेने आमच्या दिशेने येताना आम्हाला दिसली. मी आणि मिल्या रश्मीकडेच पाहत होतो आणि सीमा आमच्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहत होती. सीमाला रश्मी आवडत नाही. आवडत नाही म्हणजे ती चक्क रश्मीवर जळते. मला माझ्या आयुष्यात आतापर्यंत भेटलेली सर्वात सुंदर मुलगी म्हणजे रश्मी. गोरी पान, काळेभोर केस, उजव्याच गालाला पडणारी झिंटा स्टाइल खळी, चवळीच्या शेंगेसारखी टकाटक फिगर आणि ऐश्वर्या छाप घारे डोळे. च्यायला तिला पाहिल्यावर फक्त पाहतच राहावंसं वाटतं. हीपण आपली बालमैत्रीण. पण सीमासारखी आपण हिची टिंगल नाही करू शकत. म्हणजे जमतंच नाही. समोर आली की आमचं दुकानंच बंद होऊन जातं. देवाने माझ्यावर आतापर्यंत जे काही थोडेफार उपकार केलेत त्यात शाळेत शेवटच्या वर्षी रश्मी नेनेच्या शेजारी वर्षभर बसायला मिळणं हे उपकार वरच्या नंबरवर आहेत.

आजपण ती कडक जीन्स आणि मस्त लाल टॉप घालून आलेय. पायात हिल्स. हिने हिल्स घातले की मला भयंकर कसंसंच वाटतं कारण आम्ही शेजारी उभे राहिलो की ती माझ्यापेक्षा उंच दिसते. पण आज रिसल्ट म्हणून थोडे कमी उंच हिल्स घातलेत. मग बरंय. मिल्या दाणे खायचा विसरलाय हे तशाही परिस्थितीत माझ्या लक्षात आलं, मी ती दाण्याची पुडी पटकन त्याच्या हातातून घेतली आणि जमतील तेवढे दाणे हातात काढून घेतले.

"हाय रश्मी कशी आहेस? " मिल्या बरळला
"कशी दिसतेय" . मिल्या नुसताच दात विचकवून हसला.
" हाय सीमा" पुन्हा एकदा रश्मी. सीमाचं कसलं पारायण चाललं होतं कोण जाणे पण त्या संधीचा फायदा घेऊन तिने नुसतीच मान हालवून हाय म्हणण्याचं टाळलं.

ह्या मुलींचं ना मला कळतंच नाही. दोघी सतत बरोबर असतात पण तरीही मैत्री नाही. आता माझ्या आणि मिल्याकडेच बघा. आमचं अजिबात पटत नाही. आम्ही लाइन मारत असलेल्या मुली नेमक्या एकच असतात. आम्ही प्रचंड भांडतो, मारामारीही करतो, एकदा तर चक्क मिल्याने मला भांडणात ढकलला आणि मी उघड्या मॅनहोलमध्ये पडलो. एवढं होवूनसुद्धा आमची मैत्री कशी घट्ट आहे. ह्या पोरींचा जन्मच धूर काढण्यात जायचा.

आता सगळ्यांशी बोलून झाल्यावर रश्मी माझ्याकडे वळली. मी तिला हाय म्हणणारंच होतो, इतक्यात बाजूचा पोरांचा घोळका धावत सुटला. कुणीतरी रिझल्ट म्हणून ओरडलं. हातातली दाण्याची पुडी तशीच खाली टाकून नव्वद किलोचा मिल्या धावत सुटला. त्या क्षणीदेखील ह्याच्या वाटेत येणाऱ्या पोरांचं काय होणार ह्या कल्पनेनंच मला हसायला आलं, दोन्ही पोरींना पाठीमागे घेऊन मीही त्या गर्दीत घुसलो. गर्दीतून वाट काढण्यापेक्षा गर्दी कमी होईपर्यंत बाजूला उभं राहणं हे मला आवडतं, पण पोरी बरोबर असल्याने आपण काहीतरी हुशारी दाखवणं गरजेचं होतं. म्हणून मी उगाचच त्यांना तुम्ही इथं थांबा मी तुमचा रिसल्ट बघून येतो असं सांगून गर्दीत घुसलो.

जसं काही मी थांबा म्हटल्यावर त्या थांबणारच होत्या पण मी एकदा कर्त्या पुरुषाच्या रोलमध्ये शिरलो की मग काही अपील नाही. मी गर्दीत घुसलो खरा पण आत शिरताच ती गर्दी फायनलची होती हे कळलं. माझा अभिमन्यू झाला. आत शिरलो बाहेरच पडता येईना. बाय द वे अभिमन्यू होणे हे मिल्याने शोधलेलं क्रियापद आहे. बऱ्याच वेळा ट्रेनमधून उतरताच न आल्याने मी पुढच्या स्टेशनवर गेलेलो आहे. एवढं अख्खं वाक्य पुन्हा पुन्हा बोलण्यापेक्षा पांड्याचा अभिमन्यू झाला रे, असं म्हणून खदा खदा राक्षसासारखं हसलं की मिल्याला बरं वाटणार.

त्या गर्दीतून मी बाहेर पडेपर्यंत मिल्या, रश्मी आणि सीमा हसत हसत बाहेर आले.

"काय झालं? " मी उत्साहाने विचारलं.
"पांड्या आम्ही पास झालो" साल्याला किती वेळा सांगितलंय की रश्मीसमोर मला पांड्या म्हणत जाऊ नको म्हणून.
"माझा पाहिलात? "
"नाही रे. दिसलाच नाही". हरामखोराने पाहिला असणार पण सांगत नाहीये. मी अजिजीने पोरींकडे पाहिलं.

रश्मीने दुःखी स्माइलीसारखा चेहरा करून तिलाही माहीत नसल्याचं भासवलं. रश्मीनेही असं करावं. ह्या मिल्याचं ठीके. मी तावातावाने गर्दीत शिरायला लागलो तर लांबून सीमा ओरडली.

"पांड्या!! "
"ए परिसीमा, पांड्या म्हणायचं काम नाही हा आपल्याला"
"पांड्या" माझ्या बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही म्हणून मी अजूनच उचकलो.
"पांड्या तुला रँक आहे"

माझा क्षणभर कानांवर विश्वासच बसेना. मला रँक आहे? कसं शक्य आहे? गर्दीतून बाहेर येऊन आम्ही चौघं बसस्टॉपच्या सावलीत उभे राहिलो. पोरांची गडबड चालूच होती. कुणी पास झाला होता कुणी नापास झाला होता. कुणाला पास झाल्याचा धक्का कुणाला नापास झाल्याचा धक्का. मिल्या नापास झाला नाही ह्याचं मला बरं वाटलं. कसाही असला तरी माझा दोस्त आहे तो. सीमा आणि रश्मी पास होणारंच होत्या. मला रँक? मला वाटलं नव्हतं. पण मिळाला खरा.

काहीवेळा काही गोष्टी अगदी आपल्या ध्यानी मनी नसताना होऊन जातात. वर्षाच्या सुरवातीला उंडारून काढलेले दिवस. वर्षभर क्लासेसची पळापळ, मग शेवटी रात्र रात्र जागून केलेला अभ्यास. मग चौघांनी एकत्र भेटून डिफिकल्टीज सोडवणं, त्यातही रश्मीबरोबर जास्त राहता यावं म्हणून तिला वरचेवर फोन करणं, अभ्यासासाठी तिच्या घरी जाणं, तिचं ते असणं, तिचं ते दिसणं. ते मंतरलेपण. आणि आजचा हा रिसल्ट. रिसल्टसरशी सगळं संपलं असं वाटलं. बऱ्याच वेळा प्रवास करताना प्रवास संपण्याची घाई होते. पण प्रवासात कधी कधी प्रवासावरच आपलं प्रेम बसतं तसं काहीसं माझं झालं. कदाचित आता आमच्या सगळ्यांच्या वाटा वेगळ्या होतील. वेगळ्या वाटांच्या विचाराने मला कसंसंच झालं. मिल्या आणि सीमा आपले दोस्त आहेत, त्यांच्याशिवाय माझं काय होणार? आणि रश्मी. तिच्याशिवाय असणं हे नसणंच.

शेवट चांगला झाला खरा, पण सुरवातीपासून शेवटापर्यंत येताना जी मजा आली, तिचं काय? ती परत मिळेल मला?

उरलेला दिवस त्या चौघांबरोबर रिसल्ट सेलेब्रेट करताना ह्याच गोष्टी मनात पिंगा घालत होत्या.

(क्रमशः)

1 comment:

Anonymous said...

आवडले.. :-) असेच पुढचे पोस्ट येउद्या