Tuesday, July 7, 2009

रश्मी

पावसाने कहर केलाय आज. रात्रीपासून जोर लावलाय. मला पाऊस आवडतो. तसं मला सगळंच आवडतं. म्हणजे मला काय आवडत नाही ह्याची यादी सुरू केली तर अभ्यास ह्यापलिकडे मला दुसरं काही सुचतंच नाही. अगदी कालिदासाच्या मेघदूतापासून चार दिवस सासूचे पर्यंत मला सगळं आवडतं. मिल्या ह्याला संतपणा म्हणतो, पण मला तसं वाटत नाही. रश्मी एकटी जवळ असताना मिल्याचा नुसता विचार जरी आला तरी मला कसंसंच होतं. तसंच आता झालं.

एवढा छान पाऊस, हिरवा निसर्ग, ती आणि मी. तिने मस्त पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलाय. रश्मी नेने म्हणजे नो बाह्या. बाह्या असलेले कपडे घालणं कमीपणाचं लक्षण मानते ती. पांढरा पंजाबी, तोही पाण्याने भिजलेला म्हणजे मज्जच मज्जा नाही का? ती आणि मी दोघेही निःशब्द. बोलण्यासारखं काही आहे का ह्या क्षणी? तिचे भिजलेले कुरळे केस, थरथरणारे ओठ, लाजून चूर झालेली नजर. बोलायचं तरी काय अशा ह्या क्षणी? मी पुढे झालो. माझ्या हाताने तिची जिवणी वर केली. तिच्या मोठाल्या डोळ्यात अगदी खोलवर पाहिलं. एवढ्या पावसात तिचा आयलायनर तसाच्या तसा कसा? विस्कटला कसा नाही? हा प्रश्न मला ह्या क्षणीही पडला. पण तो तिला विचारायची कळ मी तशीच दाबून ठेवली. तिचे ओठ अजूनही तसेच. थरथरणारे. मला राहवत नाही. रश्मी नेनेचा किस? मला कसलं जबरी वाटतंय. मी माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवणार इतक्यात पाठून कुणीतरी मला गदागदा हलवायला लागलं.

पांड्या, पांड्या. मिल्याचा जोरदार आवाज कानात. चायला, हा कुठून उपटला? मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा रश्मीकडे वळलो. किस घ्यायला पुढे होणार तेवढ्यात पुन्हा मिल्या पांड्या पांड्या करून ओरडायला लागला. अरे मिल्या साल्या गप. नको तेव्हा कडमडतो. असं म्हणून मी परत रश्मीकडे वळणार तेवढ्यात मिल्याने एक गुद्दा दाणकन हाणला पाठीत. कळ थेट डोक्यात गेली. अगदी कळवळायला झालं. रश्मीपुढे मिल्याने मला मारल्याने माझा अजूनच तिळपापड झाला. तिची काय रिऍक्शन म्हणून मी डोळे उघडून बघितलं तर समोर उशी. आईगं!

घरी आई असल्याने मिल्याने दबक्या आवाजात मला दोन तीन शिव्या हाणल्या. मिल्या म्हणजे मला लागलेली ब्याद आहे असं मला कधी कधी वाटतं. स्वप्नात का होईना पण रश्मी नेनेचा किस घ्यायच्या मी किती जवळ येऊन ठेपलो होतो. पण नाही घेऊ दिला. स्वप्नातही कडमडला. मिल्याला शिव्या देत देतंच मी तयार झालो. त्याने उपम्याच्या दोन बशा आधीच संपवलेल्या असल्याने उरलेली अर्धी बशी आईने मला दिली. आईलापण त्याला पोसायला खूप आवडतं. माझ्यातलं कमी करून नेहेमी त्याला देते. खा लेका. हो जाडा.

आम्ही दोघं बाहेर पडलो. काय करायचं ते काहीच ठरलेलं नव्हतं. पावसाची रिपरिप तेवढी लागून राहिलेली. चालत चालत आम्ही रश्मी नेनेच्या बिल्डिंगपाशी आलो. तिला भेटायची जाम इच्छा झाली. किस नाही तर नाही. अगदी स्वप्नातही नाही, पण भेटायला आणि बोलायला काय करकत आहे? पण मिल्यासमोर हो बोलणं म्हणजे नको त्या त्रासाला आमंत्रण दिल्यासारखं होईल म्हणून मी गप्प बसलो. तेवढ्यात एक आयडिया सुचली. रश्मीच्या बिल्डिंगच्या खालीच एक भय्या भजी तळत बसलेला असतो. सकाळच्या वेळी तेलकट भजी खायची माझी बोलकुल इच्छा नव्हती. पण मिल्याला चालली असती नक्कीच. मी त्याला म्हटलं

"मिल्या तू माझा उपमा खल्लास, मला भूक लागलेय. भजी खाऊया का? "
कमी झालेलं व्होल्टेज परत नॉर्मल झाल्यावर दिवे उजळतात तसे मिल्याचे डोळे उजळले.
" खाऊया की. पैसे आहेत ना"
" आहेत".

आम्ही दोघं भजीवाल्याकडे गेलो. मी एक भजं कुरतडंत बसलो आणि उरलेली मिल्याच्या हातात सोपवली. तसं इथे उभं राहणं फुकटंच जाणार होतं. आता कुठे रश्मी घरी असायला? तिच्या अनंत उद्योगांपैकी एखादा उरकायला ती बाहेरंच असणार. पण अहो आश्चर्य. मिल्याची भजी संपायच्या आतंच रश्मी परत आली. मी तिला भजी ऑफर केली. पण तिने हो म्हणायच्या आतंच मिल्याने शेवटंच भजं स्वाहा केलं. आता तिच्याशी काय बोलायचं काही कळेना.

शेवटी तीच बोलली.
" रंगा, आर्टिकल्सचं ठरवलंस का? "

अख्खं जग मला पांड्या म्हणतं, पण रश्मी मात्र मला रंगा म्हणते. मला माझ्या आई वडिलांचा नेहेमी राग येतो. पांडुरंग हे काय नाव आहे का? आणि माझंच का? बहिणीचं नाव मनाली ठेवलं. मझं पण असंच एखादं ठेवलं असतं तर. मनाली आणि पांडुरंग हे एकमेकाचे भाऊ बहिण आहेत हे पटतं का? सांगायचा मुद्दा हा, की सगळं जग मला पांड्या म्हणून हाक मारत असताना रश्मी मला रंगा म्हणते, ह्याचा मला विलक्षण आनंद होतो. तिला नक्की मी आवडत असणार असंही मला वाटतं.

" नाही गं अजून. कुणी चांगलं ओळखीचंच नाही. तुझं? "
" नाही ना. ऍक्च्युअली, माझ्या ताईची मैत्रिण एका ठिकाणी करते आर्टिकल्स. तिथे जाईन कदाचित. "
" हं". (झालं आमचा चान्स गेलाच म्हणायचा आता)
" मिलिंद, तू ठरवलंस? " मिल्याला मिलिंद म्हणते नेहमी. त्याला स्वतःलाही बऱ्याच वेळा कळत नाही, हा मिलिंद कोण? कारण त्याला त्याच्या आजीपासून ते बिल्डिंगच्या झाडूवाल्यापर्यंत सगळे मिल्याच म्हणतात.
" आ? हो, म्हणजे नाही. नाही ठरवलं. आणि मी ठरवून काय उपयोग? मला घ्यायला पहिजे ना? "
" तुम्ही का नाही माझ्याबरोबर येत? त्या फर्ममधे? जिथे ताईची मैत्रिण जाते? "
" काय? नाही म्हणजे मी येतो. कधी आहे? कुठे आहे?" मला माझा उत्साह लपवता येत नाही.
" फोन करून सांगते"
" हो चालेल"

टाटा करून ती गेलीपण. मिल्याने अजून एक प्लेट भजी घेतली. मी त्याला विचारलं तोपण येणार का? तो नाही म्हणाला. म्हणाला मी डमी आर्टिकल्स करणार आहे. नोकरी आणि अभ्यास हे मला झेपणार नाही.

थोड्या वेळाने मिल्या घरी गेला. मी चालत चालत घरी आलो. रश्मीने स्वतःहून मला विचारलं की मी तिच्याबरोबर येईन का म्हणून? खूप बरं वाटलं. मग तिच्याबद्दलचं मला पडलेलं स्वप्न आठवलं. का कुणास ठाउक मलाच ते कसंसं वाटलं. ती कदाचित मला नुसता मित्र मानत असेल. चांगला मित्र. पण फक्त मित्रच कदाचित आणि मी ही कसली स्वप्न बघतोय तिच्या बद्दल. माझी मलाच शरम वाटली. आपण कुठेतरी तिचा विश्वासघात तर करीत नाही ना? असंच वाटायला लागलं. मी आणि रश्मी. आम्ही शाळेपासून एकमेकांना ओळखतो. ती सुंदर म्हणून नेहमीच आवडायची अगदी शाळेतपण. पुढे कॉलेजेस वेगळी झाली, पण सोबत सुटली नाही. मी तिच्यावर प्रेम करतो का? की ती मला नुसतीच आवडते?

कल्पना नाही. पण ती सोबत असताना मिल्याला मात्र मी थोडं हिडीस फिडीस करतो. मला माझाच राग आला. म्हणून तो आमच्यासोबत यायला नाही म्हणाला का?

(क्रमशः)

No comments: