कोणत्याही ठिकाणी इंटरव्ह्यू ला जायची माझी आयुष्यातली पहिलीच वेळ होती. तसं माँटेसरीत ऍडमिशन देताना आमच्या शाळेत माझा इंटरव्ह्यू झाला होता. पण त्या प्रसंगाची मला काहीच आठवण नसल्याने, मनोधैर्य वगैरे वाढवायला त्याचा काडीचाही उपयोग नव्हता. रश्मीच्या ताईच्या मैत्रिणीनं तिच्या ऑफिसात आम्हाला चिकटवून घेण्याचा विडाच उचलला होता. त्यामुळे काहीही टंगळ मंगळ न करता इंटरव्ह्यूला तरी जाणं आवश्यकच होतं. त्यात रश्मी बरोबर असणार होतीच, त्यामुळे आर्टिकलशिपसाठी नाही घेतलं तरी रश्मी के साथ एक तास वगैरेचा आनंद होताच.
मी त्यातल्या त्यात बरे कपडे, म्हणजे इस्त्री केलेला शर्ट आणि दोन आठवड्यापूर्वीच धुतलेली जीन्स, असे कपडे केले. माझे कपडे हा एक वेगळा विषय आहे. मला जीन्स धुतलेली अजिबात चालत नाही. आणि माझ्या आईला जे दिसतील ते कपडे उचलून मशीनमध्ये घालून खराब करून बाहेर काढण्याचा छंद आहे. त्यामुळे जुन्या जुन्या न धुतलेल्या जीन्स मी तिच्यापासून लपवून म्हणजे वेळच्या वेळी उचलून कपाटात हँगरला लावून ठेवत असतो. पण आज इंटरव्ह्यू असल्याने अशी दुर्मिळ न धुतलेली जीन्स न घालता साधारण स्वच्छ वाटवी अशी जीन्स मी घातली.
मिल्यानी म्हटल्याप्रमाणे टांग दिलीच. रश्मीशी पटत नसूनही सीमा मात्र यायला तयार झाली. ती माझ्या घराजवळच राहतं असल्याने मी आणि ती बरोबरच निघालो. मला मुलींची भीती वाटत नाही. पण एकट्याने एखाद्या मुलीबरोबर जायचं म्हटलं की माझ्या पोटात गोळा उठतो. का माहीत नाही? पण उगाचच रेस्टलेस वाटतं. तसंच वाटत होतं. रस्त्यातून जाणारे समस्त पुरूष सीमाला धक्का मारायच्या इराद्यानेच समोरून येतायत आणि तिचं संरक्षण वगैरे करणं हे माझं परम कर्तव्य आहे असं मला वाटायला लागतं आणि मी उगाचच टेन्शन येतं. त्यात मध्येच एखादं छोटं देऊळ जरी लागलं तरी सीमा थांबणार, मग काय? वेळेत पोचतो की नाही ह्याची धाकधूक लागलेली, वर इंटरव्ह्यूचं टेन्शन. त्यात रश्मी भेटणार हे अजून मोठं टेन्शन.
आम्ही ठरल्याप्रमाणे नातू ऍड बाळ चार्टर्ड अकाउंटंटस ह्यांच्या ऑफिसासमोर येऊन उभे राहिलो. तिथे ऑफिस आहे हे कळण्यासारखं तिथे काहीही नव्हतं. बरं तर बरं रश्मीने सांगून ठेवलं होतं की पांढरे आइसक्रीमच्या दुकानासमोर उभे राहा. वेळ काढणं आवश्यक होतं. मी इथे तिथे बघत होतो.
" मजा येईल ना इथे काम करायला" सीमा म्हणाली.
" हं"
" कित्ती छान आहे इथे? मला खूप आवडलं"
ऑफिसमध्ये पोचायच्या आत हिला हे सगळं कित्ती छान कसं वाटायला लागलं.
" कोपऱ्यावरच दत्ताचं देऊळ आहे"
मला आत इंटरव्ह्यूला काय होईल ह्याची काळजी लागलेली आणि हिला दत्ताची
" गुरुदेव दत्त" मी दुसऱ्या बाजूला बघत म्हटलं
" अय्या, तूपण दत्तभक्त आहेस? मला कधी सांगितलं नाहीस. कित्ती छान. मला वाटलं तुला काही इंटरेस्ट नाही देवात वगैरे"
मुद्दलच नाही तर इंटरेस्ट कुठून येणार?. मी काहीच बोललो नाही.
" ए चल ना. रश्मी येईपर्यंत देवळात जाऊन येऊया. दत्त महाराजांचे आशीर्वाद घेऊ. नक्की काम होईल"
" नको गं आता मग जाऊ. रश्मी येईलच इतक्यात". मी जरा चिडूनच बोललो.
" बरं नको तर नको" सीमा थोडी नाराज झाली.
कुणाला दुखावणं मला अजिबात आवडत नाही. पण सीमाचा देवभोळेपणा पण मला बिलकुल आवडत नाही. आणि तिला तो सोडवत नाही. ती मला आवडत नाही असं नाही. पण कधी कधी तिचा मला राग येतो आणि तो असा दिसूनही येतो. मग मीच तिला म्हणालो.
" ओके. चल जाऊया"
"...."
" सीमा. प्लीज आय ऍम सॉरी. चल ना जाऊया. इंटरव्ह्यूच्या टेन्शनने मी असं म्हणालो"
"...."
" आता जास्त आखडूपण करू नको हा. "
तिने फक्त एकदा माझ्याकडे पाहिलं आणि पटापट चालायला लागली. ती देवळाकडे चाललेय हे मला कळलं. आणि तिला लहानपणापासून ओळखत असल्याने तिचं असं वागणं मला नवं नव्हतं. मी जवळ जवळ धावतंच तिच्या मागे निघालो. ती देवळात शिरलीसुद्धा. अवदुंबराच्या झाडाभोवती बांधलेलं देऊळ आणि झाडाच्या बुंध्याला बांधलेली देवाची मूर्ती. आणि देवाच्या मूर्तीसमोर सीमा. तिच्या चेहऱ्यावरचे भाव शब्दात व्यक्त करण्यासारखे नव्हतेच. तिच्यासमोर मला मी एकदम खुजा वाटलो वरवरचा वाटलो, उथळ वाटलो. धीरगंभीर डोहासारखी दिसणारी निरव शांतता तिच्या चेहऱ्यावर दाटलेली. दारातच उंबरठ्यावर मी वाकलेला. मागच्या माणसाने धक्का दिला तेव्हा मी भानावर आलो.
तेवढ्यात "धक धक करने लगा" हे गाणं ऐकू आलं. कुठून आवाज आला म्हणून मी आजूबाजूला पाहिलं तर सगळे माझ्याकडेच बघत होते. पटकन माझी ट्यूब पेटली. माझा मोबाईल वाजत होता. धक धक करने लगा म्हणजे रश्मीचा फोन. मी पटकन बाहेर जाण्यासाठी वळलो. वळता वळता एक क्षण सीमाकडे पाहिलं ती तशीच देवापुढे हात जोडून मग्न होती.
बाहेर येऊन फोन घेतला.
" रंगा, कुठे आहात तुम्ही? मी वाट बघतेय तुमची. उशीर होईल ना आपल्याला"
" हो रश्मी, आलोच"
आत सीमा आणि पांढरे आइसक्रीमच्या समोर थांबलेली रश्मी आणि देवळाबाहेर उभा असलेला मी. आत जाऊन सीमाला बाहेर आणावं की पटकन जाऊन रश्मीला भेटावं ह्याचाच विचार करत राहिलो.
(क्रमशः)
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
100 % best... waiting for the next one.
Post a Comment