Thursday, April 28, 2011

भाग ५

बऱ्याच दिवसांनी (की वर्षांनी ) इथं लिहीत आहे. ही गोष्ट क्रमशः आहे तेव्हा पहिल्या भागापासून वाचली तर अधिक संगती लागेल.

---------------

मिल्या धापा टाकत टाकत माझ्यापुढे येऊन उभा राहिला. मला कळेना एवढं धावण्यासारखं झालं तरी काय? शेवटचा रिसल्टच्या दिवशी मिल्या धावलेला मला आठवत होता. आणि तो धावत आल्यामुळे काहीतरी गंभीर बाब तो सांगणार हे मला कळलं.

" पांड्या, आयला मज्जाच झाली. "
" मज्जा? कसली मज्जा झाली? "
" अरे काही नाही यार, मी तुला म्हटलं ना मी बाबांच्या ओळखीने डमी आर्टिकल्स टाकणारे म्हणून? "
" हो मग? "
" मग काय मग, आज मी त्या सरांना भेटायला गेलो होतो. "
" मग झालं का काम? "
" काम तर झालंच पण तुला माहितेय का, तिथे रश्मी आणि सीमापण जॉईन होतायत. "
" चले, कसं शक्य आहे? "
" अरे त्या सरांनीच सांगितलं मला. "
" तू बाळांकडे गेला होतास का? "
" नाही रे नातू म्हणून आहेत, ते पांढरे आइसक्रीमचं दुकान आहे ना? अरे दत्ताचं देऊळ आहे ना कोपऱ्यावर तिथे. "
" मिल्या, साल्या, काय सांगतोस. रश्मीच्या ताईची बहीण तिथेच काम करते, अरे आम्ही तिघंही तिथंच आहोत. "
" पांड्या, काय सांगतोस, तो नातू काही म्हणाला नाही. "
" अरे तुरे कसला करतोस, सर आहेत ना तुझे ते? "
" पांड्या, नातवाला अहो जाहो करणं नाही जमायचं मला, काय? "
" नातवाची ही गत तर बाळाची काय होईल? "

मी जोरात ओरडलो तसा मिल्या खी खी खी खी करून हसायला लागला. म्हणजे शेवटी आम्ही चौघेही एकाच फर्ममध्ये लागणार. मिल्या सोबत असल्याने मला चांगलाच धीर येणार होता. मी त्या ऑफिसमध्ये एक गोष्ट पाहिली होती. बाहेरचा चपरासी, नातू आणि बाळ सोडून सगळ्या बायकाच होत्या. त्यात रश्मी आणि सीमाची भर. बरं नातू आणि बाळांच्या किंवा बाहेरच्या चपराश्याच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारणं शक्य नव्हतं. रश्मीच्या खांद्यावर चाललं असतं, पण ते जवळ जवळ अशक्यच होतं. आणि मिल्या असला की मला एकदम माझ्या कंफर्ट झोनमध्ये असल्यासारखं वाटतं. आपल्यापेक्षा ढ, गबाळा कुणीतरी आहे म्हणून थोडा आत्मविश्वास वाढतो. आणि तो माझा मित्र तर आहेच.

" अरे मिल्या पण तू डमी टाकणारेस ना? मग काय उपयोग? " मी शंका काढली.
" पांड्या, नातू आपल्याला आवडला. तो म्हणाला डमी टाकणं चांगलं नाही, तुला हव्या तेवढ्या सुट्ट्या घे, पण अधे मध्ये तरी येत जा. "

मिल्याच्या वडील इनकम टॅक्स डिपार्टमेंटात ऑफिसर आहेत. त्यांच्या अशाच बऱ्याच बऱ्याच ओळखी असतात. ओळखीमुळे त्याची सगळी कामं अशी सोपी होतात. तरी ओळखीमुळे मार्क देत नाहीत हे बरं, नाहीतर माझ्यापेक्षा त्यालाच मार्क जास्त मिळाले असते. ओळखीमुळे त्याला अशी आव जाव घर तुम्हारा आर्टिकलशीप मिळते, ओळखीमुळे दर सुट्टीला मिल्या आणि मंडळी दूरदूर कुठल्या कुठल्या ठिकाणी जातात. आमच्या बाबांच्या ओळखी का नाहीत असा प्रश्न मला नेहमी पडतो. कधी कधी मिल्याचा खूप रागही येतो, जळफळाट होतो. पण कधी कधी काही लोकं मिल्याचे बाबा पैसे खातात असं म्हणतात, तेव्हा आपल्या बाबांच्या ओळखी नाहीत याचं बरंही वाटतं. अर्थात ते पैसे खात असतील असं मला वाटत नाही. खाण्याचं खातं मिल्याकडेच आहे.

जसा आला तसा मिल्या निघून गेला, आईची स्वैपाकघरात काहीतरी धावपळ चाललेली. मग मी एकटाच कॉटवर पडून विचार करीत राहिलो. उद्यापासून कामाला सुरुवात करायची होती. असं सकाळी उठून डबा वगैरे घेऊन कामाला जायचं आणि मस्त संध्याकाळपर्यंत असं रपारप रपारप कामंच करीत राहायचं. जबरदस्त मजा येणार होती. बाळ पगाराचं काही बोलले नव्हते, पण पहिल्या वर्षाला किमान तीनशेवीस रुपये द्यावे लागतात हे माहीत होतं. महिन्याला तीनशेवीस म्हणजे आठवड्याला ऐंशी. दिवसाचे साधारण साडेअकरा रुपये. जवळ जवळ चार वडापाव, किंवा दोन वडापाव आणि दोन ऊसाचे रस. रपारप रपारप काम करून मी दमलो तर फक्त एवढंच?

बराच वेळ विचारांची गाडी रूळ बदलत राहिली. नातू, बाळ, चपराशी, मिल्या, सीमा, रश्मी आणि ऑफिसातल्या उरलेल्या साळकाया म्हाळकाया एकामागोमाग डोळ्यासमोर येत होत्या. चपराशी, नातू आणि बाळ नको तितक्या वेळा आठवत होते. करता करता कधी झोप लागली काही कळलंच नाही.

Tuesday, July 28, 2009

नातू अँड बाळ - बाळ

शेवटी एकदाचं सीमाला देवळातून बाहेर काढून आम्ही पांढरे आइसक्रीमच्या समोर पोचलो. काउंटरवर पांढरे बसले होते. त्यांचा रंग काळा कुळकुळीत होता. कुणाचा रंग कसा असावा ह्याबाबत माझी काही मतं नाहीत. माझा स्वतःचाच रंग गोरा नाही. म्हणजे खाजगीतही मी सावळा आहे वगैरे म्हणण्याचं धाडस मी करू शकत नाही. पण इतक्या काळ्या माणसाचं नाव देवाने पांढरे का ठेवावं ह्याचंच मला आश्चर्य वाटून राहिलेलं. पांढरे आणि त्यांची आइसक्रीम्स ह्यांच्याकडे दुर्लक्ष करत मी पायऱ्या चढायला लागलो.

पायऱ्या भारी उंच होत्या, त्यामुळे मी पटकन पुढे झालो चढायला. आता अशा उंचच उंच पायऱ्यांवर चढताना मुलगी पुढे असली म्हणजे दोन पायऱ्या सोडून चालावं लागतं. तसं केलं म्हणजे डोळ्यासमोर सभ्य मुलाने जिथे एकटक नजर लावून बघायला नको ते येतं. धड पुढेही बघता येत नाही, धड खालीही बघता येत नाही. थांबलो आणि उगाच पुढची मुलगी थांबली तर नको तो अपघात होण्याचा धोका. समोर पाहिलं तर मला चुकून कुणी पाहत असेल तर इमेज खराब होण्याचा धोका. हे सगळं दिव्य टाळण्यासाठी म्हणून मी पुढे झालो खरा पण त्यामुळे दरवाज्याशी मी पहिला पोचलो. आणि बेल दाबून आतल्या नातवा बाळांशी बोलायची माझ्या पिटुकल्या खांद्यांना न पेलवणारी जबाबदारी माझ्या अंगावर येऊन पोचली. बरोबर रश्मी आणि सीमा असल्याने पचका होऊन चालणार नव्हतं. अशा वेळी मला दुसऱ्या नंबरवर राहायला आवडतं. म्हणजे बोलण्याची जोखीम आपल्या डोक्यावर नसते पण आतल्या माणसाला आपण नक्की दिसतो.

तर मी बेल दाबली. एक अतिशय नम्र अदबशीर वगैरे वाटणारा माणूस दरवाजा उघडायला आला. मला वाटलं आनंद बाळ आले. आम्ही कोण हे अर्थातच त्यांना कळलं नाही. तो काही बोलणार इतक्यात मीच दामटवून म्हणालो.

"हॅलो. आय ऍम मायसेल्फ पांडुरंग जोशी अलाँग वुइथ माय फ्रेंडस हॅव्ह कम टू सी यू" हुश्श.

इतकं मोठं इंग्रजी वाक्य एका दमात बोलण्याची वेळ ह्या आधी माझ्यावर आलेली नव्हती. जीना चढताना अख्खा वेळ मी ह्या वाक्याची जुळवाजुळव करीत होतो. आता ते बोलून टाकल्यावर माझ्या मनावरचा ताण हलका झाला. पण आलेल्या माणसाने पुन्हा एकदा आम्हा तिघांना निरखून पाहिलं आणि म्हणाला

"कोण पाहिजे"
"आम्हाला तुम्हाला भेटायचंय"
"कुणाला"
"तुम्हाला सर"
"मला? थट्टा करू नका. लवकर बोला कुणाला भेटायचंय."

माझी एकंदरीतच वळलेली बोबडी पाहून रश्मीनं सूत्र तिच्या हाती घ्यायचं ठरवलं.

"आनंद बाळ आहेत का? माझं नाव रश्मी आम्हा तिघांना त्यांनी भेटायला बोलावलं होतं"
" मग अस्सं सांगा ना. सांगतो सायबांना. या तुम्ही बसा"

मला बाळ वाटलेला माणूस चपराशी निघाला. त्याचे कपडे माझ्यापेक्षाही चांगले होते. पण पहिल्याच बॉल ला क्लीन बोल्ड झाल्यासारखं मला वाटलं. सीमा आणि रश्मी एकमेकींशी बोलत होत्या. मी त्यांच्यापासून दूर सभ्य मुलासारखा बसून इकॉनॉमिक टाइम्स वाचत होतो. शेवटी आनंद बाळांनी आम्हाला बोलावलं. ते स्वतः केबिनमधून बाहेर आले आणि मुलींकडे बघून त्यांना

"ओह सॉरी तुम्हाला जरा थांबायला लागलं. या. या. "

तिथे मीही आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. अर्थात कुणाच्या लक्षात येण्यासारखं माझं व्यक्तिमत्त्व नाहीच आहे. तिथली टेबलं खुर्च्या, झाडाच्या कुंड्या, चपलांचा स्टँड ह्यांच्यासारखाच मी एक. असा बहुदा बाळांचा समज झाला असावा. आम्ही तिघं असल्याचं रश्मीने त्यांना सांगितलं. मग त्यांनी मलाही आत घेतलं. माझ्याकडे बघून त्यांना फारसा आनंद झाला असं वाटलं नाही. पांढरे आइसक्रीमवाल्या पांढऱ्यांसारखं, आनंद बाळांचं नावही त्यांना शोभत नाही असं मल वाटून गेलं.

मग बराच वेळ बाळ स्वतःची लाल करीत बसले. आम्ही असे आणि आम्ही तसे. तुम्हाला कसं इथे भरपूर शिकायला मिळेल. आम्ही कसे चांगलेच आहोत वगैरे. मी यांत्रिकपणे मान डोलवत होतो. संधी मिळाली की रश्मीकडे पाहत होतो. सीमा आणि रश्मी एकदम लक्ष देऊन ऐकत होत्या आणि बाळांचं लक्षही त्यांच्याकडेच होतं, त्यामुळे मी ऐकत नसल्याचं त्यांच्या गावीही नव्हतं. शेवटी एकदाचं बाळ पुराण संपलं. सीमा आणि रश्मी दोघींनीही बाळांना प्रश्न विचारले. त्यांनी त्यांची उत्तर दिली.

इंटरव्ह्यू म्हणता म्हणता एकही प्रश्न न विचारताच बाळांनी भेट संपवली. दोघी पोरी खूश होत्या. जाता जाता बाळ म्हणाले मग फोन करून सांगा कधी पासून जॉईन होणार ते. मी हो म्हटलं.

एका बाजूला खूप बरं वाटलं. आर्टिकलशिपची चिंता मिटली. ते एक काम झालं. तीन वर्ष रश्मी सोबत असणार ह्याचा आनंद सर्वाधिक झाला. पण दुसऱ्या बाजूला थोडं वाईटही वाटलं. खरंतर आम्हा तिघांत मला सर्वात जास्त मार्क मिळाले होते. मला रँक मिळाला होता. त्या दोघींना नाही. पण बाळ एका शब्दाने म्हणाले देखिल नाहीत की तुला चांगले मार्क मिळाले वगैरे. अख्खा वेळ त्या दोघींशी बोलण्यात घालवला. जसा मी तिथे नव्हतोच. त्या दोघींसमोर माझा असा अनुल्लेख मला खूप लागला. त्या दोघींना घेतलं आणि मी बरोबर होतो म्हणून मला पण घेतलं का? की मी त्या लायकीचा आहे म्हणून मला घेतलं. एकदा वाटलं होतं सरळ उठून निघून जावं. आर्टिकलशिपची काय कमी नाही. इथे नाही तर तिथे होईल. पण दुसरीकडे रश्मी नसती ना.

घरी पोचलो. आईनं विचारलं कसं काय झालं वगैरे. काहीही कारण नसताना मी तिलाच तिरकी उत्तरं देत राहिलो. कपडे बदलण्याकरता माझ्या खोलीत गेलो. समोरंच आमचं जुनं कपाट ठेवलेलं होतं. कपाटावर धुरकट झालेला आरसा होता. माझी जुनी जीन्स, अजागळ शर्ट. डोक्याचे आणि दाढीचे वाढलेले केस. मला रश्मी कशी मिळणार होती? कोण माझ्याकडे का लक्ष देणार होतं.

बराच वेळ स्वतःला बघत राहिलो. पांड्या म्हणून मिल्या जिन्यातूनच ओरडला तेव्हाच भानावर आलो.

(क्रमशः)

Wednesday, July 22, 2009

सीमा

कोणत्याही ठिकाणी इंटरव्ह्यू ला जायची माझी आयुष्यातली पहिलीच वेळ होती. तसं माँटेसरीत ऍडमिशन देताना आमच्या शाळेत माझा इंटरव्ह्यू झाला होता. पण त्या प्रसंगाची मला काहीच आठवण नसल्याने, मनोधैर्य वगैरे वाढवायला त्याचा काडीचाही उपयोग नव्हता. रश्मीच्या ताईच्या मैत्रिणीनं तिच्या ऑफिसात आम्हाला चिकटवून घेण्याचा विडाच उचलला होता. त्यामुळे काहीही टंगळ मंगळ न करता इंटरव्ह्यूला तरी जाणं आवश्यकच होतं. त्यात रश्मी बरोबर असणार होतीच, त्यामुळे आर्टिकलशिपसाठी नाही घेतलं तरी रश्मी के साथ एक तास वगैरेचा आनंद होताच.

मी त्यातल्या त्यात बरे कपडे, म्हणजे इस्त्री केलेला शर्ट आणि दोन आठवड्यापूर्वीच धुतलेली जीन्स, असे कपडे केले. माझे कपडे हा एक वेगळा विषय आहे. मला जीन्स धुतलेली अजिबात चालत नाही. आणि माझ्या आईला जे दिसतील ते कपडे उचलून मशीनमध्ये घालून खराब करून बाहेर काढण्याचा छंद आहे. त्यामुळे जुन्या जुन्या न धुतलेल्या जीन्स मी तिच्यापासून लपवून म्हणजे वेळच्या वेळी उचलून कपाटात हँगरला लावून ठेवत असतो. पण आज इंटरव्ह्यू असल्याने अशी दुर्मिळ न धुतलेली जीन्स न घालता साधारण स्वच्छ वाटवी अशी जीन्स मी घातली.

मिल्यानी म्हटल्याप्रमाणे टांग दिलीच. रश्मीशी पटत नसूनही सीमा मात्र यायला तयार झाली. ती माझ्या घराजवळच राहतं असल्याने मी आणि ती बरोबरच निघालो. मला मुलींची भीती वाटत नाही. पण एकट्याने एखाद्या मुलीबरोबर जायचं म्हटलं की माझ्या पोटात गोळा उठतो. का माहीत नाही? पण उगाचच रेस्टलेस वाटतं. तसंच वाटत होतं. रस्त्यातून जाणारे समस्त पुरूष सीमाला धक्का मारायच्या इराद्यानेच समोरून येतायत आणि तिचं संरक्षण वगैरे करणं हे माझं परम कर्तव्य आहे असं मला वाटायला लागतं आणि मी उगाचच टेन्शन येतं. त्यात मध्येच एखादं छोटं देऊळ जरी लागलं तरी सीमा थांबणार, मग काय? वेळेत पोचतो की नाही ह्याची धाकधूक लागलेली, वर इंटरव्ह्यूचं टेन्शन. त्यात रश्मी भेटणार हे अजून मोठं टेन्शन.

आम्ही ठरल्याप्रमाणे नातू ऍड बाळ चार्टर्ड अकाउंटंटस ह्यांच्या ऑफिसासमोर येऊन उभे राहिलो. तिथे ऑफिस आहे हे कळण्यासारखं तिथे काहीही नव्हतं. बरं तर बरं रश्मीने सांगून ठेवलं होतं की पांढरे आइसक्रीमच्या दुकानासमोर उभे राहा. वेळ काढणं आवश्यक होतं. मी इथे तिथे बघत होतो.

" मजा येईल ना इथे काम करायला" सीमा म्हणाली.
" हं"
" कित्ती छान आहे इथे? मला खूप आवडलं"
ऑफिसमध्ये पोचायच्या आत हिला हे सगळं कित्ती छान कसं वाटायला लागलं.
" कोपऱ्यावरच दत्ताचं देऊळ आहे"
मला आत इंटरव्ह्यूला काय होईल ह्याची काळजी लागलेली आणि हिला दत्ताची
" गुरुदेव दत्त" मी दुसऱ्या बाजूला बघत म्हटलं
" अय्या, तूपण दत्तभक्त आहेस? मला कधी सांगितलं नाहीस. कित्ती छान. मला वाटलं तुला काही इंटरेस्ट नाही देवात वगैरे"
मुद्दलच नाही तर इंटरेस्ट कुठून येणार?. मी काहीच बोललो नाही.
" ए चल ना. रश्मी येईपर्यंत देवळात जाऊन येऊया. दत्त महाराजांचे आशीर्वाद घेऊ. नक्की काम होईल"
" नको गं आता मग जाऊ. रश्मी येईलच इतक्यात". मी जरा चिडूनच बोललो.
" बरं नको तर नको" सीमा थोडी नाराज झाली.

कुणाला दुखावणं मला अजिबात आवडत नाही. पण सीमाचा देवभोळेपणा पण मला बिलकुल आवडत नाही. आणि तिला तो सोडवत नाही. ती मला आवडत नाही असं नाही. पण कधी कधी तिचा मला राग येतो आणि तो असा दिसूनही येतो. मग मीच तिला म्हणालो.

" ओके. चल जाऊया"
"...."
" सीमा. प्लीज आय ऍम सॉरी. चल ना जाऊया. इंटरव्ह्यूच्या टेन्शनने मी असं म्हणालो"
"...."
" आता जास्त आखडूपण करू नको हा. "

तिने फक्त एकदा माझ्याकडे पाहिलं आणि पटापट चालायला लागली. ती देवळाकडे चाललेय हे मला कळलं. आणि तिला लहानपणापासून ओळखत असल्याने तिचं असं वागणं मला नवं नव्हतं. मी जवळ जवळ धावतंच तिच्या मागे निघालो. ती देवळात शिरलीसुद्धा. अवदुंबराच्या झाडाभोवती बांधलेलं देऊळ आणि झाडाच्या बुंध्याला बांधलेली देवाची मूर्ती. आणि देवाच्या मूर्तीसमोर सीमा. तिच्या चेहऱ्यावरचे भाव शब्दात व्यक्त करण्यासारखे नव्हतेच. तिच्यासमोर मला मी एकदम खुजा वाटलो वरवरचा वाटलो, उथळ वाटलो. धीरगंभीर डोहासारखी दिसणारी निरव शांतता तिच्या चेहऱ्यावर दाटलेली. दारातच उंबरठ्यावर मी वाकलेला. मागच्या माणसाने धक्का दिला तेव्हा मी भानावर आलो.

तेवढ्यात "धक धक करने लगा" हे गाणं ऐकू आलं. कुठून आवाज आला म्हणून मी आजूबाजूला पाहिलं तर सगळे माझ्याकडेच बघत होते. पटकन माझी ट्यूब पेटली. माझा मोबाईल वाजत होता. धक धक करने लगा म्हणजे रश्मीचा फोन. मी पटकन बाहेर जाण्यासाठी वळलो. वळता वळता एक क्षण सीमाकडे पाहिलं ती तशीच देवापुढे हात जोडून मग्न होती.

बाहेर येऊन फोन घेतला.


" रंगा, कुठे आहात तुम्ही? मी वाट बघतेय तुमची. उशीर होईल ना आपल्याला"
" हो रश्मी, आलोच"

आत सीमा आणि पांढरे आइसक्रीमच्या समोर थांबलेली रश्मी आणि देवळाबाहेर उभा असलेला मी. आत जाऊन सीमाला बाहेर आणावं की पटकन जाऊन रश्मीला भेटावं ह्याचाच विचार करत राहिलो.

(क्रमशः)

Tuesday, July 7, 2009

रश्मी

पावसाने कहर केलाय आज. रात्रीपासून जोर लावलाय. मला पाऊस आवडतो. तसं मला सगळंच आवडतं. म्हणजे मला काय आवडत नाही ह्याची यादी सुरू केली तर अभ्यास ह्यापलिकडे मला दुसरं काही सुचतंच नाही. अगदी कालिदासाच्या मेघदूतापासून चार दिवस सासूचे पर्यंत मला सगळं आवडतं. मिल्या ह्याला संतपणा म्हणतो, पण मला तसं वाटत नाही. रश्मी एकटी जवळ असताना मिल्याचा नुसता विचार जरी आला तरी मला कसंसंच होतं. तसंच आता झालं.

एवढा छान पाऊस, हिरवा निसर्ग, ती आणि मी. तिने मस्त पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलाय. रश्मी नेने म्हणजे नो बाह्या. बाह्या असलेले कपडे घालणं कमीपणाचं लक्षण मानते ती. पांढरा पंजाबी, तोही पाण्याने भिजलेला म्हणजे मज्जच मज्जा नाही का? ती आणि मी दोघेही निःशब्द. बोलण्यासारखं काही आहे का ह्या क्षणी? तिचे भिजलेले कुरळे केस, थरथरणारे ओठ, लाजून चूर झालेली नजर. बोलायचं तरी काय अशा ह्या क्षणी? मी पुढे झालो. माझ्या हाताने तिची जिवणी वर केली. तिच्या मोठाल्या डोळ्यात अगदी खोलवर पाहिलं. एवढ्या पावसात तिचा आयलायनर तसाच्या तसा कसा? विस्कटला कसा नाही? हा प्रश्न मला ह्या क्षणीही पडला. पण तो तिला विचारायची कळ मी तशीच दाबून ठेवली. तिचे ओठ अजूनही तसेच. थरथरणारे. मला राहवत नाही. रश्मी नेनेचा किस? मला कसलं जबरी वाटतंय. मी माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवणार इतक्यात पाठून कुणीतरी मला गदागदा हलवायला लागलं.

पांड्या, पांड्या. मिल्याचा जोरदार आवाज कानात. चायला, हा कुठून उपटला? मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा रश्मीकडे वळलो. किस घ्यायला पुढे होणार तेवढ्यात पुन्हा मिल्या पांड्या पांड्या करून ओरडायला लागला. अरे मिल्या साल्या गप. नको तेव्हा कडमडतो. असं म्हणून मी परत रश्मीकडे वळणार तेवढ्यात मिल्याने एक गुद्दा दाणकन हाणला पाठीत. कळ थेट डोक्यात गेली. अगदी कळवळायला झालं. रश्मीपुढे मिल्याने मला मारल्याने माझा अजूनच तिळपापड झाला. तिची काय रिऍक्शन म्हणून मी डोळे उघडून बघितलं तर समोर उशी. आईगं!

घरी आई असल्याने मिल्याने दबक्या आवाजात मला दोन तीन शिव्या हाणल्या. मिल्या म्हणजे मला लागलेली ब्याद आहे असं मला कधी कधी वाटतं. स्वप्नात का होईना पण रश्मी नेनेचा किस घ्यायच्या मी किती जवळ येऊन ठेपलो होतो. पण नाही घेऊ दिला. स्वप्नातही कडमडला. मिल्याला शिव्या देत देतंच मी तयार झालो. त्याने उपम्याच्या दोन बशा आधीच संपवलेल्या असल्याने उरलेली अर्धी बशी आईने मला दिली. आईलापण त्याला पोसायला खूप आवडतं. माझ्यातलं कमी करून नेहेमी त्याला देते. खा लेका. हो जाडा.

आम्ही दोघं बाहेर पडलो. काय करायचं ते काहीच ठरलेलं नव्हतं. पावसाची रिपरिप तेवढी लागून राहिलेली. चालत चालत आम्ही रश्मी नेनेच्या बिल्डिंगपाशी आलो. तिला भेटायची जाम इच्छा झाली. किस नाही तर नाही. अगदी स्वप्नातही नाही, पण भेटायला आणि बोलायला काय करकत आहे? पण मिल्यासमोर हो बोलणं म्हणजे नको त्या त्रासाला आमंत्रण दिल्यासारखं होईल म्हणून मी गप्प बसलो. तेवढ्यात एक आयडिया सुचली. रश्मीच्या बिल्डिंगच्या खालीच एक भय्या भजी तळत बसलेला असतो. सकाळच्या वेळी तेलकट भजी खायची माझी बोलकुल इच्छा नव्हती. पण मिल्याला चालली असती नक्कीच. मी त्याला म्हटलं

"मिल्या तू माझा उपमा खल्लास, मला भूक लागलेय. भजी खाऊया का? "
कमी झालेलं व्होल्टेज परत नॉर्मल झाल्यावर दिवे उजळतात तसे मिल्याचे डोळे उजळले.
" खाऊया की. पैसे आहेत ना"
" आहेत".

आम्ही दोघं भजीवाल्याकडे गेलो. मी एक भजं कुरतडंत बसलो आणि उरलेली मिल्याच्या हातात सोपवली. तसं इथे उभं राहणं फुकटंच जाणार होतं. आता कुठे रश्मी घरी असायला? तिच्या अनंत उद्योगांपैकी एखादा उरकायला ती बाहेरंच असणार. पण अहो आश्चर्य. मिल्याची भजी संपायच्या आतंच रश्मी परत आली. मी तिला भजी ऑफर केली. पण तिने हो म्हणायच्या आतंच मिल्याने शेवटंच भजं स्वाहा केलं. आता तिच्याशी काय बोलायचं काही कळेना.

शेवटी तीच बोलली.
" रंगा, आर्टिकल्सचं ठरवलंस का? "

अख्खं जग मला पांड्या म्हणतं, पण रश्मी मात्र मला रंगा म्हणते. मला माझ्या आई वडिलांचा नेहेमी राग येतो. पांडुरंग हे काय नाव आहे का? आणि माझंच का? बहिणीचं नाव मनाली ठेवलं. मझं पण असंच एखादं ठेवलं असतं तर. मनाली आणि पांडुरंग हे एकमेकाचे भाऊ बहिण आहेत हे पटतं का? सांगायचा मुद्दा हा, की सगळं जग मला पांड्या म्हणून हाक मारत असताना रश्मी मला रंगा म्हणते, ह्याचा मला विलक्षण आनंद होतो. तिला नक्की मी आवडत असणार असंही मला वाटतं.

" नाही गं अजून. कुणी चांगलं ओळखीचंच नाही. तुझं? "
" नाही ना. ऍक्च्युअली, माझ्या ताईची मैत्रिण एका ठिकाणी करते आर्टिकल्स. तिथे जाईन कदाचित. "
" हं". (झालं आमचा चान्स गेलाच म्हणायचा आता)
" मिलिंद, तू ठरवलंस? " मिल्याला मिलिंद म्हणते नेहमी. त्याला स्वतःलाही बऱ्याच वेळा कळत नाही, हा मिलिंद कोण? कारण त्याला त्याच्या आजीपासून ते बिल्डिंगच्या झाडूवाल्यापर्यंत सगळे मिल्याच म्हणतात.
" आ? हो, म्हणजे नाही. नाही ठरवलं. आणि मी ठरवून काय उपयोग? मला घ्यायला पहिजे ना? "
" तुम्ही का नाही माझ्याबरोबर येत? त्या फर्ममधे? जिथे ताईची मैत्रिण जाते? "
" काय? नाही म्हणजे मी येतो. कधी आहे? कुठे आहे?" मला माझा उत्साह लपवता येत नाही.
" फोन करून सांगते"
" हो चालेल"

टाटा करून ती गेलीपण. मिल्याने अजून एक प्लेट भजी घेतली. मी त्याला विचारलं तोपण येणार का? तो नाही म्हणाला. म्हणाला मी डमी आर्टिकल्स करणार आहे. नोकरी आणि अभ्यास हे मला झेपणार नाही.

थोड्या वेळाने मिल्या घरी गेला. मी चालत चालत घरी आलो. रश्मीने स्वतःहून मला विचारलं की मी तिच्याबरोबर येईन का म्हणून? खूप बरं वाटलं. मग तिच्याबद्दलचं मला पडलेलं स्वप्न आठवलं. का कुणास ठाउक मलाच ते कसंसं वाटलं. ती कदाचित मला नुसता मित्र मानत असेल. चांगला मित्र. पण फक्त मित्रच कदाचित आणि मी ही कसली स्वप्न बघतोय तिच्या बद्दल. माझी मलाच शरम वाटली. आपण कुठेतरी तिचा विश्वासघात तर करीत नाही ना? असंच वाटायला लागलं. मी आणि रश्मी. आम्ही शाळेपासून एकमेकांना ओळखतो. ती सुंदर म्हणून नेहमीच आवडायची अगदी शाळेतपण. पुढे कॉलेजेस वेगळी झाली, पण सोबत सुटली नाही. मी तिच्यावर प्रेम करतो का? की ती मला नुसतीच आवडते?

कल्पना नाही. पण ती सोबत असताना मिल्याला मात्र मी थोडं हिडीस फिडीस करतो. मला माझाच राग आला. म्हणून तो आमच्यासोबत यायला नाही म्हणाला का?

(क्रमशः)

Sunday, June 28, 2009

रिझल्ट

"च्यायला काय उपटत बसलेत इतका वेळ? "

खाऱ्या शेंगदाण्याच्या पंधराव्या पुडीतला शेवटचा दाणा एका जोरकस शिवीसह दाताखाली कुटताना मिल्या म्हणाला. भयंकर टेन्शन आलं की मिल्या शेंगदाणे खातो. आणि तो सतत कुठल्या ना कुठल्या टेन्शनमध्येच असतो. शेंगदाणे खाऊन खाऊन तो स्वतः बटाट्यासारखा झाला आहे. वर तो एवढ्या भरभर शेंगदाणे संपवतो की एक एक रुपया काढून दोन रुपयाचे दाणे घेतले तरी दोन पैशाचेसुद्धा आपल्याला मिळत नाहीत. आणि आज तर त्याला एकदम जोर चढलेला. परीक्षेचा निकाल ह्यापेक्षा अधिक टेन्शन देणारी गोष्ट कोणती असेल?

मिल्याच्या पुड्या संपतायत तर त्याच्या बाजूला सीमा उभी राहून कायतरी पुटपुटतेय. तशी सीमा चांगली आहे. पण एकदम भोळी आहे. दिसायला नाकी डोळी नीटस वगैरे आहेच, पण एकदम बारीकपण आहे. सीमा मिल्याच्या शेजारी उभी राहिली की एकतर दहा नाहीतर एक ह्यापैकी एखादा आकडा आपण बघतोय असं वाटतं. तिचा साधेपणा, उर्फ भोळेपणा उर्फ बावळटपणा सोडला तर ती छानच आहे. आज जरा डोळे दमल्यासारखे वाटतायत. रात्रभर झोपली नसणार. आमची सीमा म्हणजे भक्तिभावाची परिसीमा आहे. रस्त्यात दिसलेल्या प्रत्येक देवळाला हात जोडलेच पाहिजेत असा तिचा नियम आहे. रोज सकाळी आणि झोपायच्या आधी रात्री न चुकता ती देवाला वगैरे नमस्कार करते. झालंच तर ती वार लावून देवळात पण जाते. सोमवारी शंकररावांपासून सुरवार होते ती शनिवारी मारुतरावांपाशी जाऊनच तिचा आठवडा संपतो. रविवारी ती देवदर्शनापासून स्वतःला सुट्टी देते. मी तिची खूप टिंगल करतो, पण ती मला कधीच उलट बोलत नाही. तशी आमची एकदम लहानपणापासूनची मैत्री आहे.

तेवढ्यात मिल्या अजून एक दाण्याची पुडी घेऊन आला.

"अरे काय हे साले काय लावलंय काय? वाजले किती? करतायत काय हे लोक? " आल्या आल्या माझ्यावरच डाफरला.
"लेका, दाणे खाऊन खाऊन पित्त चढलंय तुझं. जरा चिल! "
"चिल म्हणे चिल, पांड्या तुझं ठीके, तू अभ्यास करून बसलायस. आम्ही साले पोरी पाहत राहिलो ना ओ वर्षभर"
"अजून सांगतोय सुधार, दाणे खातानासुद्धा त्या पांढऱ्या पंजाबीवरची नजर हटत नाहीये तुझी"
" पांड्या गप्प. अरे टेन्शन आलं की असंच होतं"

आमचं हे असलं बोलणं सीमाच्या सहनशक्तीपलीकडचं होतं. आता ती कानावर कात ठेवून हिंदी पिक्चरमधल्या नटीसारखी "नही" असं ओरडणार तितक्यात "रश्मी" असं मी बेंबीच्या देठापासून ओरडलो. पोरांच्या घोळक्यातून रश्मी नेने आमच्या दिशेने येताना आम्हाला दिसली. मी आणि मिल्या रश्मीकडेच पाहत होतो आणि सीमा आमच्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहत होती. सीमाला रश्मी आवडत नाही. आवडत नाही म्हणजे ती चक्क रश्मीवर जळते. मला माझ्या आयुष्यात आतापर्यंत भेटलेली सर्वात सुंदर मुलगी म्हणजे रश्मी. गोरी पान, काळेभोर केस, उजव्याच गालाला पडणारी झिंटा स्टाइल खळी, चवळीच्या शेंगेसारखी टकाटक फिगर आणि ऐश्वर्या छाप घारे डोळे. च्यायला तिला पाहिल्यावर फक्त पाहतच राहावंसं वाटतं. हीपण आपली बालमैत्रीण. पण सीमासारखी आपण हिची टिंगल नाही करू शकत. म्हणजे जमतंच नाही. समोर आली की आमचं दुकानंच बंद होऊन जातं. देवाने माझ्यावर आतापर्यंत जे काही थोडेफार उपकार केलेत त्यात शाळेत शेवटच्या वर्षी रश्मी नेनेच्या शेजारी वर्षभर बसायला मिळणं हे उपकार वरच्या नंबरवर आहेत.

आजपण ती कडक जीन्स आणि मस्त लाल टॉप घालून आलेय. पायात हिल्स. हिने हिल्स घातले की मला भयंकर कसंसंच वाटतं कारण आम्ही शेजारी उभे राहिलो की ती माझ्यापेक्षा उंच दिसते. पण आज रिसल्ट म्हणून थोडे कमी उंच हिल्स घातलेत. मग बरंय. मिल्या दाणे खायचा विसरलाय हे तशाही परिस्थितीत माझ्या लक्षात आलं, मी ती दाण्याची पुडी पटकन त्याच्या हातातून घेतली आणि जमतील तेवढे दाणे हातात काढून घेतले.

"हाय रश्मी कशी आहेस? " मिल्या बरळला
"कशी दिसतेय" . मिल्या नुसताच दात विचकवून हसला.
" हाय सीमा" पुन्हा एकदा रश्मी. सीमाचं कसलं पारायण चाललं होतं कोण जाणे पण त्या संधीचा फायदा घेऊन तिने नुसतीच मान हालवून हाय म्हणण्याचं टाळलं.

ह्या मुलींचं ना मला कळतंच नाही. दोघी सतत बरोबर असतात पण तरीही मैत्री नाही. आता माझ्या आणि मिल्याकडेच बघा. आमचं अजिबात पटत नाही. आम्ही लाइन मारत असलेल्या मुली नेमक्या एकच असतात. आम्ही प्रचंड भांडतो, मारामारीही करतो, एकदा तर चक्क मिल्याने मला भांडणात ढकलला आणि मी उघड्या मॅनहोलमध्ये पडलो. एवढं होवूनसुद्धा आमची मैत्री कशी घट्ट आहे. ह्या पोरींचा जन्मच धूर काढण्यात जायचा.

आता सगळ्यांशी बोलून झाल्यावर रश्मी माझ्याकडे वळली. मी तिला हाय म्हणणारंच होतो, इतक्यात बाजूचा पोरांचा घोळका धावत सुटला. कुणीतरी रिझल्ट म्हणून ओरडलं. हातातली दाण्याची पुडी तशीच खाली टाकून नव्वद किलोचा मिल्या धावत सुटला. त्या क्षणीदेखील ह्याच्या वाटेत येणाऱ्या पोरांचं काय होणार ह्या कल्पनेनंच मला हसायला आलं, दोन्ही पोरींना पाठीमागे घेऊन मीही त्या गर्दीत घुसलो. गर्दीतून वाट काढण्यापेक्षा गर्दी कमी होईपर्यंत बाजूला उभं राहणं हे मला आवडतं, पण पोरी बरोबर असल्याने आपण काहीतरी हुशारी दाखवणं गरजेचं होतं. म्हणून मी उगाचच त्यांना तुम्ही इथं थांबा मी तुमचा रिसल्ट बघून येतो असं सांगून गर्दीत घुसलो.

जसं काही मी थांबा म्हटल्यावर त्या थांबणारच होत्या पण मी एकदा कर्त्या पुरुषाच्या रोलमध्ये शिरलो की मग काही अपील नाही. मी गर्दीत घुसलो खरा पण आत शिरताच ती गर्दी फायनलची होती हे कळलं. माझा अभिमन्यू झाला. आत शिरलो बाहेरच पडता येईना. बाय द वे अभिमन्यू होणे हे मिल्याने शोधलेलं क्रियापद आहे. बऱ्याच वेळा ट्रेनमधून उतरताच न आल्याने मी पुढच्या स्टेशनवर गेलेलो आहे. एवढं अख्खं वाक्य पुन्हा पुन्हा बोलण्यापेक्षा पांड्याचा अभिमन्यू झाला रे, असं म्हणून खदा खदा राक्षसासारखं हसलं की मिल्याला बरं वाटणार.

त्या गर्दीतून मी बाहेर पडेपर्यंत मिल्या, रश्मी आणि सीमा हसत हसत बाहेर आले.

"काय झालं? " मी उत्साहाने विचारलं.
"पांड्या आम्ही पास झालो" साल्याला किती वेळा सांगितलंय की रश्मीसमोर मला पांड्या म्हणत जाऊ नको म्हणून.
"माझा पाहिलात? "
"नाही रे. दिसलाच नाही". हरामखोराने पाहिला असणार पण सांगत नाहीये. मी अजिजीने पोरींकडे पाहिलं.

रश्मीने दुःखी स्माइलीसारखा चेहरा करून तिलाही माहीत नसल्याचं भासवलं. रश्मीनेही असं करावं. ह्या मिल्याचं ठीके. मी तावातावाने गर्दीत शिरायला लागलो तर लांबून सीमा ओरडली.

"पांड्या!! "
"ए परिसीमा, पांड्या म्हणायचं काम नाही हा आपल्याला"
"पांड्या" माझ्या बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही म्हणून मी अजूनच उचकलो.
"पांड्या तुला रँक आहे"

माझा क्षणभर कानांवर विश्वासच बसेना. मला रँक आहे? कसं शक्य आहे? गर्दीतून बाहेर येऊन आम्ही चौघं बसस्टॉपच्या सावलीत उभे राहिलो. पोरांची गडबड चालूच होती. कुणी पास झाला होता कुणी नापास झाला होता. कुणाला पास झाल्याचा धक्का कुणाला नापास झाल्याचा धक्का. मिल्या नापास झाला नाही ह्याचं मला बरं वाटलं. कसाही असला तरी माझा दोस्त आहे तो. सीमा आणि रश्मी पास होणारंच होत्या. मला रँक? मला वाटलं नव्हतं. पण मिळाला खरा.

काहीवेळा काही गोष्टी अगदी आपल्या ध्यानी मनी नसताना होऊन जातात. वर्षाच्या सुरवातीला उंडारून काढलेले दिवस. वर्षभर क्लासेसची पळापळ, मग शेवटी रात्र रात्र जागून केलेला अभ्यास. मग चौघांनी एकत्र भेटून डिफिकल्टीज सोडवणं, त्यातही रश्मीबरोबर जास्त राहता यावं म्हणून तिला वरचेवर फोन करणं, अभ्यासासाठी तिच्या घरी जाणं, तिचं ते असणं, तिचं ते दिसणं. ते मंतरलेपण. आणि आजचा हा रिसल्ट. रिसल्टसरशी सगळं संपलं असं वाटलं. बऱ्याच वेळा प्रवास करताना प्रवास संपण्याची घाई होते. पण प्रवासात कधी कधी प्रवासावरच आपलं प्रेम बसतं तसं काहीसं माझं झालं. कदाचित आता आमच्या सगळ्यांच्या वाटा वेगळ्या होतील. वेगळ्या वाटांच्या विचाराने मला कसंसंच झालं. मिल्या आणि सीमा आपले दोस्त आहेत, त्यांच्याशिवाय माझं काय होणार? आणि रश्मी. तिच्याशिवाय असणं हे नसणंच.

शेवट चांगला झाला खरा, पण सुरवातीपासून शेवटापर्यंत येताना जी मजा आली, तिचं काय? ती परत मिळेल मला?

उरलेला दिवस त्या चौघांबरोबर रिसल्ट सेलेब्रेट करताना ह्याच गोष्टी मनात पिंगा घालत होत्या.

(क्रमशः)